नवी दिल्ली - सैन्यदलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालाचा भारतीय कंपन्या वापर करत आहेत. स्वस्तामधील कच्चा माल उपलब्ध होत असल्याने असे घडत आहे. मात्र त्याचा बुलेटप्रुफ जॅकेटच्या दर्जावर परिणाम होणार नसल्याचा खुलासा नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.सारस्वत यांनी केला.
चीनी कच्च्या मालापासून तयार झालेली बुलेटप्रुफ जॅकेट निकृष्ट असल्यासच आपण हस्तक्षेप करू शकतो, असे सारस्वत यांनी म्हटले आहे. मात्र तसे आढळून आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते डीआरडीओचे माजी अध्यक्ष आहेत.
चीनमधील कच्च्या मालापासून तयार करण्यात आलेली बुलेटप्रुफ जॅकेट ही स्वस्त आणि बाजारात चालणारी असल्याचे सारस्वत यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, हे बाजारातील आर्थिक गणित (मार्केट फोर्स) आहे. त्याबाबत आम्ही काही फारसे करू शकत नाही. बुलेटप्रुफ जॅकेटबाबत आम्ही मानांकन तयार केली आहेत. या मानांकनाच्या चाचण्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँण्डर्सने (बीआयएस) घेतल्या आहेत.
सैन्यदलाला ३ लाखांहून अधिक बुलेटप्रुफ जॅकेटची आवश्यकता -
सरकारच्या अंदाजानुसार सैन्यदलाला ३ लाखांहून अधिक बुलेटप्रुफ जॅकेटची आवश्यकता आहे. त्यानुसार सैन्यदलाने देशातील खासगी कंपन्यांना जॅकेट तयार करण्याची ऑर्डर काढली आहे. यापूर्वी देशातील कंपन्या युरोप आणि अमेरिकेकडून कच्च्या माल घेत होत्या. मात्र, आता बहुतांश कंपन्या स्वस्त दरामुळे चीनकडून कच्चा माल घेत आहेत.
कानपूरची एमकेयू आणि टाटा अॅडव्हान्सड मटेरियल्स एक्सपोर्ट ही कंपनी अनेक देशांतील सैन्यदलांना बुलेटप्रुफ जॅकेट पुरविते. कमी वजनाचे बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्यासाठी स्वदेशी कंपन्यांना सवलती देण्यात येणार आहेत. त्यासाठी रोडमॅप तयार करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोगाला केली आहे. सध्या सैन्यदलाकडे अधिक वजनाचे बुलेटप्रुफ जॅकेट आहेत. मात्र सैन्यदलाला कमी वजनाची जॅकेट हवी आहेत.