Gandhi Jayanti 2024: दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. यावर्षी भारतामध्ये बापूंची 155 वी जयंती साजरी केली जात आहे. केवळ भारतातच नव्हे विदेशामध्ये देखील महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. आज पर्यंत ७० हून अधिक देशांनी गांधीजींचे पुतळे उभारले आहेत. गांधी जयंती जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरी केली जाते.
- गांधी जयंती इतिहास आणि महत्त्व: महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटीश राजवटीविरुद्ध अहिंसक संघर्ष करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गांधीजींसह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांमुळे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानानं जगभरातील अनेकांना प्रेरणा दिली आहे.
- 2 ऑक्टोबर विशेष दिवस: 1948 मध्ये महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर, गांधी जयंती ही राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली. हा दिवस केवळ त्यांच्या जीवनाचा सन्मान करण्यासाठीच नव्हे तर शांतता आणि सौहार्दाच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठीही साजरा केला जातो. बापूंच्या शिकवणीचा आदर करून, ती जीवनात अंगीकारून राष्ट्राचं रक्षण व टिकाव धरण्याचा दिवस म्हणून हा दिवस पाळला जातो. गांधींची शिकवण आपल्याला शांततापूर्ण प्रतिकारशक्तीची आठवण करून देते. कोणत्याही हिंसक मार्गाशिवाय प्रत्येक स्तरावर न्यायासाठी उभे रहा. हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा धडा आहे.
- अनेक देशांमध्ये गांधी स्मारकाची स्थापना: महात्मा गांधींनी केवळ ब्रिटीश वसाहतवादामुळे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही. तर, जगाला अहिंसेचा धडाही शिकवला. जगभरातील लोक आजही गांधींना शांततेचे प्रतीक मानतात. जगभरातील विविध देशांनी महात्मा गांधींच्या स्मरणार्थ स्मारके आणि पुतळे समर्पित केले आहेत. शांतता, मानवता आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून लोक त्यांचा आदर करतात. येथे बापूंचे स्मारक कोणत्या देशात बसवले आहे.
- परदेशात महात्मा गांधींना समर्पित 10 स्मारके
- लेक श्राइन, कॅलिफोर्निया, यूएसए: येथे गांधी जागतिक शांतता स्मारक आहे. त्यात हजार वर्ष जुनी चिनी शवपेटी आहे. गांधीजींच्या अस्थीचा काही भाग पितळी-चांदीच्या शवपेटीमध्ये ठेवला आहे. हे स्मारक 1950 मध्ये बांधले गेले.
- युनायटेड किंगडम: युनायटेड किंगडममधील वेस्टमिन्स्टर येथील संसद चौकात गांधींचा 9 फूट उंच कांस्य पुतळा बसवण्यात आला आहे. फिलिप जॅक्सननं तो तयार केला होता. गांधींच्या 1931 च्या छायाचित्रावरून तो प्रेरित आहे.
- लंडनचा पार्लमेंट स्क्वेअर: अलीकडेच 14 मार्च 2015 रोजी लंडनमध्ये महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला. फिलीप जॅक्सन या कलाकारानं हा पुतळा तयार केला आहे. याच्या अनावरण सोहळ्याला तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, गांधींचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते.
- एरियाना पार्क, जिनेव्हा : जिनिव्हा येथील एरियाना पार्कमध्ये गांधींचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्यात गांधीजी बसून एक पुस्तक वाचत आहे. 2007 मध्ये भारत-स्विस मैत्रीच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त त्याचं अनावरण करण्यात आलं. पुतळ्यावर 'मा वी एस्ट मोन मेसेज' असे लिहिले आहे. फ्रेंचमध्ये याचा अर्थ 'माझे जीवन माझा संदेश' असा होतो.
- गार्डन ऑफ पीस वियना, ऑस्ट्रेलिया: कलाकार वर्नर हॉर्व्हथ यांनी गांधींचे शांतता आणि अहिंसेसाठी केलेले योगदान चित्रित करण्यासाठी त्यांचे तैलचित्र तयार केले.
- मेमोरियल गार्डन जिंगा युगांडा : 1948 मध्ये, महात्मा गांधींच्या अस्थींचा काही भाग झिंगा येथे नाईल नदीत टाकण्यात आला होता. त्याच ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आले आहे.
- ग्लेबे पार्क, कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया: कॅनबेरा येथील ग्लेबे पार्कमध्ये गांधींचा कांस्य पुतळा बसवण्यात आला आहे. गांधींचा कांस्य पुतळा त्यांची तत्त्वे प्रतिबिंबित करतो.
- प्लाजा सिसिलिया, ब्यूनस आयर्स, अर्जेंटिना: भारताच्या स्वातंत्र्याच्या 15 व्या वर्षी, भारत सरकारनं अर्जेंटिनाला राम वानजी सुतार यांनी बनवलेला गांधींचा पुतळा भेट दिला.
- चर्च स्ट्रीट, पीटरमैरिट्जबर्ग, दक्षिण आफ्रिका : हे ते शहर आहे जिथे 1893 मध्ये एका गोऱ्या माणसानं गांधींना ट्रेनमधून फेकलं होतं. दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेसमंड टुटू यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
- कोपनहेगन, डेन्मार्क: इंदिरा गांधी 1984 मध्ये डेन्मार्क दौऱ्यावर असताना कोपनहेगन शहरातील बापूंचा पुतळा डॅनिश सरकारला सादर करण्यात आला होता. 2 ऑक्टोबर रोजी बापूंचा पुतळा असलेल्या सर्व ठिकाणी गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली.