नवी दिल्ली - चीनने दोन वर्षानंतर भारताकडून तांदळाची निर्यात केली आहे. चीनने भारतामधून ५ हजार टन बिगर बासमती तांदूळ आयात करण्याची मागणी केली आहे. भारताने कमी दर दिल्याने चीनने तांदूळ आयात करत असल्याचे ऑल इंडिया एक्सपोर्ट्स असोसिएशने (एआयआरईए) म्हटले आहे.
चीनने भारतीय तांदळासाठी २००६ मध्ये बाजारपेठ खुली केली. प्रत्यक्षात आयात ही आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुरू केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवरून वाद होत असताना चीनने तांदूळ आयातीचा निर्णय घेतला आहे. चीनने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बिगर बासमती ९७४ टन तांदळाची आयात केली होती. दोन वर्षे खंड पडल्यानंतर पुन्हा आयातीसाठी चौकशी सुरू झाल्याचे एआयआरईएचे कार्यकारी संचालक विनोद कौल यांनी सांगितले.
- चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत १५० टनाहून कमी बासमती तांदळाची भारताने निर्यात केली आहे.
- चीनने ब्रोकन राईस म्हटल्या जाणाऱ्या दक्षिणेतील तांदळाची दोन महिन्यात ५ हजार टन इतकी आयातीसाठी मागणी केली आहे. हा तांदूळ नूडल्स व मद्यउद्योगात वापरण्यात येतो.
- शेजारील देशांमध्ये तांदळाचा साठा आहे. तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे थायलंड व व्हिएतनामधील व्यापारावर परिणाम झाला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारताकडून स्पर्धात्मक किमतीत तांदळाचा पुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
- एआयआरईएच्या माहितीनुसार भारताने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये ६.१ दशलक्ष टन बिगर बासमती तांदळाची निर्यात केली. तर २.८ बासमती तांदळाची एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये निर्यात केली आहे.
- भारत हा तांदळाच्या निर्यातीमधील आघाडीचा देश आहे. तर चीन हा तांदळाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये सीमारेषेवरून भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. राजनैतिक तसेच सैन्यदलाच्या पातळीवर चर्चा होऊनही अद्याप सीमारेषेवरील वादाबाबत तोडगा निघाला नाही.