वॉशिंग्टन - व्यापारी युद्धावर तोडगा निघू शकला नसल्याचे खापर चीनने अमेरिकेवर फोडले आहे. ट्रम्प प्रशासनाने एका रात्रीत विचार बदलल्याने व्यापारी सौद्याची बोलणी फिस्कटल्याचा चीनने आरोप केला आहे.
चीनचे अमेरिकेतील राजदूत कूई तिनकाई यांनी अमेरिकन माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हुवाई कंपनीला तंत्रज्ञान विकणे व हस्तांतरण करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय व्हाईट हाऊसने राजकीय हेतून घेतला आहे. अशा कृत्याने बाजार सुरळित चालण्यावरील लोकांचा आत्मविश्वास कमी होणार आहे. आम्ही खूप चिंतित आहोत.
पुढे ते म्हणाले, आमचे दरवाजे खुले आहेत. मार्ग निघेपर्यंत अमेरिकन सहकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यापारी युद्ध बोलण्यासाठी चीनचे शिष्टमंडळ अमेरिकेला गेले असताना बोलणी फिस्कटली. त्यानंतरअमेरिकेने चीनच्या २० हजार कोटी डॉलर मुल्याच्या उत्पादनावरील आयात शुल्क वाढविले आहे. त्यांनतर प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकेच्या ६ हजार कोटी डॉलर मुल्यांच्या उत्पादनावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची १ जुनपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
हुवाई आणि चीनच्या सैन्यदलात खूप जवळचे संबध असल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळे अमेरिकेने हुवाईच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. तुर्तास हा बंदीचा निर्णय अमेरिकेने ९० दिवसांसाठी पुढे ढकलला आहे.