नवी दिल्ली - नीरव मोदीच्या कंपनीनंतर आणखी एका कंपनीने सरकारी बँकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) फ्रॉस्ट इंटरनॅशनल कंपनी विरोधात ४ हजार ६१.२५ कोटी रुपयांची बँकांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. सीबीआयने मुंबईसह उत्तर प्रदेशमधील कंपनीची मालकी असलेल्या विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.
फ्रॉस्ट इंटरनॅशनल ही मुंबईस्थित कंपनी विविध मालांची आयात आणि निर्यात करते. सीबीआयने दोन दिवसापूर्वी काही बँकेचे अधिकारी, १३ लोकांसह कंपनीविरोधात गुन्हा नोंदविला आहे. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक उदय जयंत देसाई, सुजय उदय देसाई, सुनील लालचंद वर्मा आणि अनिल कुमार वढेरा, संचालक आणि कंपनीला जामीन देणारे व्यक्ती यांचा समावेश आहे.
हेही वाचा-केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटविणार?
या बँकांची झाली फसवणूक
बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, विजया बँक, अलाहाबाद बँक आणि युनायटेड बँक.
हेही वाचा-५जीच्या दहापट ६जीचे वेगवान इंटरनेट; 'या' देशात सुरू करण्याचे प्रयत्न
गुन्हा दाखल झालेल्या सर्व आरोपींविरोधात सर्व विमानतळांवर लूक आऊटचे आदेश देण्यात आले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या कानपूर शाखेने फ्रॉस्ट इंटरनॅशनल कंपनीविरोधात तक्रार दिली होती. कंपनीने बँकांच्या कर्जाची सर्व रक्कम थकविली आहे. तर कंपनीचे खाते ही सर्व बँकांनी अनुत्पादक मालमत्तेत (एनपीए) वर्गीकृत केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.