मुंबई - बँक ऑफ महाराष्ट्राच्या दोन कर्मचारी संघटनेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून खासगीकरणाच्या प्रक्रियेबद्दल स्पष्टतेची मागणी केली आहे. पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याच्या चर्चेबाबत कर्मचारी संघटनेला स्पष्टता हवी आहे.
युको बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे खासगीकरण होणार असल्याचे काही माध्यमात वृत्त आले. त्याबाबत ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन (एआयबीओएमईएफ) आणि बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने (बीओएमओए) पत्र लिहिले आहे. माध्यमातील वृत्तानुसार बँक कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये अनिश्चितता निर्माण झाल्याचे कर्मचारी संघटनांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
काही बँकांच्या शाखांमध्ये ग्राहक पैसे काढत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. येस बँक, आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि पीएमसी बँक या अशा दुर्दैवी घटना घडल्याचेही संघटनेने पत्रात नमूद केले. बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीची (एसएलबीसी) समन्वयक आहे. या बँकेच्या २८ राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेशात १ हजार ८३२ शाखा आहेत. बँक ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेची प्रायोजक आहे. या बँकेच्या मागासलेल्या मराठवाड्यात ३३५ शाखा आहेत. ही ग्रामीण बँक राज्याची जीवनवाहिनी आहे. सरकारची भूमिका स्पष्ट करून ग्राहक व ठेवीदारांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी कर्मचारी संघटनेने केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे.