नवी दिल्ली - कामगार विधेयकातील कामगारविरोधी तरतुदी ताततडीने काढून टाकाव्यात, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाने सरकारकडे केली आहे. या कायद्यातील तरतुदीला विरोध करत देशभरात २८ ऑक्टोबरला आंदोलन करणार असल्याचे मजदूर संघाने म्हटले आहे. भारतीय मजदूर संघाने ऑनलाईन पत्रकार परिषेदत ही माहिती दिली आहे.
सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकाळ, सतत आंदोलन करण्याचे भारतीय मजदूर संघाने नियोजन केले आहे. यामध्ये कामगारांचा संप करण्याचा हक्क असल्याचे संघाने म्हटले आहे. कामगार विधेयकातील कामगारविरोधी तरतुदींवर चर्चा करण्यासाठी सर्व व्यापारी संघटनांना चर्चेला बोलवावे, अशी मजदूर संघाने सरकारला विनंती केली आहे.
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तीन कामगाराशीं संबंधित विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये औद्योगिक संबंध विधेयक, सामाजिक सुरक्षा विधेयक, ऑक्युपशनल सिक्युरिटी आणि आरोग्य आणि कामाच्या स्थितीबाबतचे विधेयक यांचा समावेश आहे. वेतन विधेयक हे संसदेने २०१९ मध्ये मंजूर केले आहे.
मजदूर संघाकडून १० ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत 'इशारा सप्ताह' हा कार्यक्रम देशभरात घेण्यात येणार आहे. भारतीय मजदूर संघाने सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) बदल करण्याची मागणी केली आहे. ही जीडीपी काढण्याची प्रक्रिया सदोष असल्याचा मजदूर संघाने दावा केला.