नवी दिल्ली - यंदा सरासरीहून कमी पर्जन्यान असेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने नुकताच वर्तविला आहे. याचा ग्रामीण भागातील गृहपयोगी (एफएमसीजी) क्षेत्राच्या वृद्धीवर परिणाम होईल, असे मत नेस्ले इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी व्यक्त केले.
शेतीच्या कच्च्या मालाच्या किमती वरचेवर वाढत आहेत, अशा स्थितीत मान्सूनचे प्रमाण कमी झाल्यास आणखी परिस्थिती खराब होईल, असा सुरेश नारायणन यांनी अंदाज व्यक्त केला. गेल्या दोन वर्षात अन्नाच्या किंमती घसरलेल्या आहेत. जर मान्सूनची स्थिती कठीण झाली तर यात बदल होईल, असेही त्यांनी सांगितले.
जर मान्सून सरासरीहून कमी झाला तर निश्चितच ग्रामीण भागातील मागणीवर चिंताजनक परिणाम होणार असल्याचे नारायणन यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की घाऊक बाजारात पतपुरवठा होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे खरेदी आणि साठा ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाजारात कर्ज आणि पैशांची उपलब्धतेचा प्रश्न असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम म्हणून नेस्लेच्या ग्रामीण भागातील व्यवसायावर कमीत कमी एकूण २० ते २५ टक्के परिणाम होईल, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. मात्र, घाऊक बाजारात नेस्लेचे प्रमाण कमी असल्याने हा परिणाम फारसा नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील एफएमसीजी क्षेत्राची दरवर्षी साधारणत:१३ ते १४ वृद्धी होत असल्याची त्यांनी माहिती दिली.