नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून कर्जाची मागणी वाढते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी बँका गुरुवारपासून कर्ज मेळावे भरविणार आहेत. हे मेळावे देशातील २५० जिल्ह्यांत आयोजित करण्यात येणार आहेत. यामधून ग्राहकांना किरकोळ कर्जासह एमएसएमई उद्योगासाठी कर्ज दिले जाणार आहे.
बँका ३ ऑक्टोबरपासून चार दिवसीय कर्ज मेळावे भरविणार आहे. यामध्ये कृषी, किरकोळ, वाहन, घर, एमएसएमई, शिक्षण आणि वैयक्तिक कर्ज हे जागेवर मंजूर केले जाणार आहे.
कर्ज मेळाव्यासाठी सर्व बँकांकडून तयारी करण्यात येत आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॉर्पोरेशन सहभागी होणार आहे. याशिवाय गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या, सीडबी आणि खासगी बँकांही मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा-२१ व्या शतकातील भारतासाठी महात्मा गांधींचे 'हे' आहेत आर्थिक विचार
बँक ऑफ बडोदाकडून 'बडोदा किसान पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत बँकेकडून कृषीकर्ज देण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नुकताच घेण्यात आलेल्या वार्षिक कामगिरीच्या आढाव्यानंतर सरकारी बँकांनी जास्तीत जास्तीत ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बँकांनी देशातील ४०० जिल्ह्यांची निवड केली आहे.
हेही वाचा-अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी निवड
कर्ज मेळावे हा ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा आणि बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याचा भाग आहे. कर्ज दिले जाताना बँकांच्या नियमांप्रमाणे दिले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दुसऱ्या टप्प्यात २१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत बँकांकडून कर्ज मेळावे घेणार आहेत. सणासुदीत ग्राहकांच्या हातात पैसा खुळखुळणार असल्याने विविध उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-गायीच्या शेणापासून तयार केलेल्या साबणाचे नितीन गडकरींकडून लाँचिंग