यवतमाळ - कोरोनाच्या काळात मंदीची लाट असतानासुद्धा सूत उत्पादनात महागाव तालुक्यातील पिंपळगाव कान्हा येथील बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीने गगन भरारी घेतली आहे. सूतगिरणीने दर्जेदार सुताची निर्मिती केल्यामुळे या सुताला विदेशातून मोठी मागणी आहे. त्यामुळे या गिरणीच्या दर्जदार सुताची निर्यात चीन व हॉंगकॉंग या देशात सातासमुद्रापार केली जात आहे.
बाबासाहेब नाईक सूतगिरणी ही महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तर विदर्भात ही सूतगिरणी पहिल्या क्रमांकावर आहे. या सूतगरिणीत उपलब्ध असलेल्या टीएफओ या अद्ययावत यंत्रवर तयार करण्यात आलेल्या 16 अकाउंटच्या दर्जेदार सुताला मंदीच्या काळातही मोठी मागणी आहे. एकूण दहा कंटेनरद्वारा 200 टन सुताची मागणी चीन व हॉगकॉग या देशातून नोंदविण्यात आली आहे. जास्त भाव मिळत असल्याने गिरणीच्या व्यवस्थापनाकडून सूत निर्यातीला प्राधान्य दिले जात आहे.
कोरोना संसर्गजन्य काळातही गिरणीच्या व्यवस्थापनाकडून एक पाऊल पुढे टाकले आहे. संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री मनोहर नाईक, गिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक एम.आय. पाथरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे टाळेबंदीनंतर तीन पाळ्यात पूर्ण क्षमतेने सूत उत्पादन सुरू आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या सहभागातून 89 टक्के उत्पादन क्षमतेचा वापर होत आहे.
नवीन मशिनमध्ये दर्जेदार सुताची निर्मिती-
बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक म्हणाले, की ही जुनी संस्था आहे. जुन्या मशिनमध्ये बदल करून नवीन मशिन बसविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळात कामगारांना रोजगार टिकविण्यावर भर देण्यात आला आहे. संस्थेला पुढे नेण्यासाठी आधुनिकीकरण करण्यात आले आहे. जुन्या मशिनमध्ये धागा तुटला तर हाताने पुन्हा जोडावा लागत होता. नवीन मशीनमध्ये दर्जेदार सुताची निर्मिती होत आहे. त्यासाठी कामगारांचे सहकार्य मिळत आहे. सूतगिरणीचे संचालक विलास गंगाले म्हणाले, की जागतिक मंदी असूनही चीन व हाँगकाँगसारख्या देशात निर्यात होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. अडचणी असताना सक्षम नेतृत्वामुळे मात करत आहोत. नियोजनपद्धतीने काम सुरू आहे. राज्यात पूर्वी ३२७ सूतगरिण्या असताना सध्या जेमतेम पाच ते सात सूतगिरण्या आहेत. त्यात नाईक सूतगिरणी आघाडीवर असणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे गंगाले यांनी सांगितले.