मुंबई - भारतीय वाहन उद्योगाने मागील २० वर्षातील सर्वात खराब कामगिरी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बजावली आहे. कारण या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाहनांच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत 57.98 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात टाळेबंदी लागू झाली होती. त्यामुळे वाहनांची कमी मागणी झाल्याने देशातील वाहन उद्योग संकटात सापडला आहे.
- सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरसने दिलेल्या माहितीनुसार जून 2019 च्या तिमाहीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत युटिलिटी वाहनांच्या विक्रीत 31. 16 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
- गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा व्हॅनच्या विक्रीत 62.06 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
- सियामच्या ताज्या आकडेवारीनुसार गतवर्षीच्या एप्रिल ते जूनच्या कालावधीत यंदा प्रवासी वाहनांच्या विक्रीत 49.59 टक्क्यांची घसरण झाली आहे.
- जून 2019 अखेरीस असलेल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा जूनअखेरच्या तिमाहीत दुचाकी वाहनांच्या विक्रीत 38.56 टक्के घसरण झाली आहे. तर तीन चाकी वाहनांच्या विक्रीत 80.15 टक्के घसरण झाली.
- गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा प्रवासी वाहनांच्या निर्यातीत 56.31 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर तीन चाकी वाहनांच्या निर्यातीत 34.98 टक्क्यांची घसरण झाली आहे.
- दुचाकी वाहनांच्या निर्यातीत 34.25 टक्क्यांची घसरण झाली आहे.
कोरोनाच्या संकटापूर्वी देशातील वाहन उद्योग संकटात आहे. आधीच कमी मागणी असल्याने वाहन उद्योग मंदीतून जात होता. त्यात कोरोना महामारीमुळे वाहन उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. या क्षेत्राला परत अच्छे दिन कधी येणार हा खरा प्रश्न आहे.
जुलैमध्ये एमजी मोटर्स इंडिया कंपनी वगळता सर्वच कंपन्यांच्या वाहन विक्रीत घसरण झाली आहे.
- गतवर्षीच्या जुलैच्या तुलनेत मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये 1.1 टक्क्यांची घसरण झाली आहे.
- ह्युदांई मोटर इंडियाच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये 28 टक्क्यांची घसरण झाली आहे. जुलैमध्ये ह्युदांईच्या 41 हजार 300 वाहनांची विक्री झाली आहे.
- महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये 36 टक्के घसरण झाली आहे. महिंद्राच्या वाहनांची जुलैमध्ये 25 हजार 678 वाहनांची विक्री झाली आहे.
- टोयोटा किर्लोस्करच्या वाहन विक्रीत जुलैमध्ये 48 टक्के घसरण झाली आहे. जुलै 2020 मध्ये देशात 5,386 वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी देशात 10,423 वाहनांची विक्री झाली होती.