मुंबई - लोकसभा निवडणूक म्हटले की अनेक उद्योगांसाठी सुगीचे दिवस येतात. विमान उद्योगातही असेच झाले आहे. व्हीआयपी नेत्यांच्या प्रचारासाठी सर्व विमाने आणि चॉपर यांचे राजकीय पक्षांनी बुकिंग केले आहे. विमान भाड्याने देणाऱ्या कंपन्यांनी हाऊसफुलचे कार्यालयाबाहेर बोर्डही लावले आहेत.
निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे राजकीय पक्षांना विमान आणि चॉपरचे भाडे चुकते करावे लागणार आहे. प्रचारादरम्यान वेगवान प्रवास आणि दुर्गम भागातही पोहोचणे शक्य होत असल्याने विविध पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी चॉपरला पसंती दिली आहे. तर लहान आकाराची विमाने छोट्या धावपट्टीवरही उतरू शकत असल्याने त्यांचीही बुकिंग करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त मतदारसंघात पोहोचता येत असल्याने राजकीय नेत्यांकडून सर्वात अधिक पसंती हेलिकॉप्टरला देण्यात येते. विकसित देशासारखे भारतात अनेक चॉपर आणि लहान विमाने उपलब्ध नाहीत. देशात २७५ नागरी हेलिकॉप्टरची नोंदणी असल्याचे वेस्टर्न चॅप्टर ऑफ रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाचे (आरडब्ल्यूएसआय) अध्यक्ष कॅप्टन उदय गेल्ली यांनी सांगितले.
यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीचे, खासगी क्षेत्रातील चॉपर आहेत. तर वैयक्तिक मालकीचे सुमारे ७५ चॉपर आहेत. तर, कमी आकाराचे पंखे आणि एक इंजिन असलेले सेस्सनासारख्या विमानाला देशात परवानगी नसल्याचे हवाई उद्योगातील तज्ज्ञ प्रदीप थांपी यांनी सांगितले. सध्या २ इंजिन असललेल्या विमानांना अधिक मागणी आहे. पायलट प्लस फाईव किंग एअर सी ९० आणि प्लस ८ किंग एअर बी २०० विमानांना चांगली मागणी आहे. ही विमाने देशात १२ आहेत. मात्र, मे'च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ही विमाने शिल्लक नाहीत.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह अथवा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे छोटे विमान अथवा हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार नाहीत. सुरक्षेच्या कारणास्तव ते जवळ असलेल्या चांगल्या विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानातून प्रवास करतील, असे ते म्हणाले. एक आणि दोन इंजिन असलेले विमाने ही युरोकॉप्टर, रॉबिन्सन, बेल आणि सिकॉरस्काय कंपनीचे आहेत. यामध्ये वैमानिकांसह ११ आसने आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीनिमित्त या विमानांचे बुकिंग झालेले आहे.
देशात किती चॉपर उपल्बध आहेत, याची आकडेवारी उपल्बध नाही. मात्र, भाजप हा चॉपरचा सर्वात मोठा ग्राहक असल्याचे गेल्ली यांनी सांगितले. एकट्या भाजपने ५० टक्के चॉपर भाड्याने घेतली आहेत. मात्र, चॉपरच्या वैमानिकांना प्रचारादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे विशेषत: ग्रामीण भागात अधिक चिंता वाटते.