नवी दिल्ली - देशाने ५जीच्या सेवेमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने ५जी सेवेची हैदराबादमधील वाणिज्य नेटवर्कमध्ये यशस्वी चाचणी केली आहे. नेटवर्कमध्ये ५जीसाठी तयारी झाल्याचे एअरटेलने म्हटले आहे.
एअरटेलची ५जीची चाचणी यशस्वी झाली असली तरी त्यासाठी लागणारे स्पेक्ट्रम आणि सरकारची परवानगी मिळाल्यानंतर ग्राहकांना त्याचा अनुभव मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. ५जीची चाचणी यशस्वी झाल्याने कंपनीची तंत्रज्ञानविषयक क्षमता अधोरेखित झाल्याचे एअरटेलने म्हटले आहे. यावर बोलताना भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ गोपाल विठ्ठल म्हणाले की, टेक सिटीत अद्वितीय क्षमता दाखविण्यासाठी ज्या अभियंत्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत, त्यांचा मला खूप अभिमान आहे. आमची प्रत्येक गुंतवणूक ही भविष्य सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. ही चाचणी गेमचेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा-अॅप बंदी: भारताकडून नियमांचा भंग केल्याची चीनकडून कागाळी
५जी नवतंत्रज्ञानात ग्लोबल हब होण्याची भारताची क्षमता-
पुढे कंपनीचे सीईओ विठ्ठल म्हणाले की, ५जीची यशस्वी चाचणी करणारी एअरटेल ही देशातील पहिली दूरसंचार कंपनी आहे. भारतीयांचे सक्षमीकरण करण्यासाठी नवतंत्रत्राज्ञात आम्ही अग्रगण्य असल्याचे आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भारतामध्ये ५जी नवतंत्रज्ञानात ग्लोबल हब होण्याची क्षमता आहे. त्यासाठी इकोसिस्टिम, अॅप्लिकेशन्स, डिव्हाईस आणि नेटवर्कमधील संशोधनाची गरज आहे. हैदराबादमध्ये १८०० मेगाहार्टझ बँड या क्षमतेवर ५जीची चाचणी घेण्यात आली. या स्पेक्ट्रमवर ५जी आणि ४जी दोन्ही सेवा सुरू होऊ शकतात, असा एअरटेलने दावा केला.
हेही वाचा-महामारीतही देशाच्या थेट गुंतवणुकीत १३ टक्क्यांनी वाढ
सिंगल रेडिओ अॅक्सेस नेटवर्क (एसआरएएन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भारती एअरटेलने नोकियाबरोबर काही वर्षांचा करार केला आहे. हे तंत्रज्ञान देशातील नऊ सर्कलमध्ये वापरता येणार आहे. नोकियाच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने भविष्यातील ५ जीच्या जोडणीची (कनेक्टिव्हिटी) पायाभरणी होणार असल्याचे भारती एअरटेलने यापूर्वीच म्हटले आहे.