जयपूर – रोजगार नसल्याने संकटात सापडलेल्या स्थलांतरित मजुरांना दिलासादायक बातमी आहे. सौर उर्जाच्या क्षेत्रात स्थलांतरित मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अदानी समुहाने राजस्थान जिल्ह्यातील सहा जिल्ह्यात सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थानमध्ये रेल्वेच्या विविध प्रकल्पांमधून स्थलांतरित मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. तर यापुढील काळात सौर उर्जा क्षेत्रातूनही मजुरांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. अदानी समुहाने जैसलमेर, बिकानेर, जोधपूर, जालोर आणि बाडमेर जिल्ह्यात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाचही प्रकल्पामधून 10 हजार मेगा वॅट तयार करण्याचा प्रस्ताव अदानी समुहाने गुंतवणूक प्रोत्साहन विभागाला दिला आहे. सौर प्रकल्प उभा करताना सुमारे 75 हजार स्थलांतरित मजुरांना रोजगार मिळेल, असे सूत्राने सांगितले.
या प्रस्तावावर गुंतवणूक विभागाने उर्जा, वित्त आणि मनुष्यबळ संसधान विभागाकडून सूचना मागविल्या आहेत. या प्रकल्पांना लवकरच मंजुरी मिळणयाची शक्यता आहे. असे झाले तर कोरोना आणि टाळेबंदीचा फटका बसलेल्या स्थलांतरितांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, अदानी ग्रीन एनर्जी (एजीएएल) कंपनीला कोरोना महामारीच्या संकटादेखील मोठे व्यावसायिक यश मिळाले आहे.भारतीय सौर ऊर्जा महामंडळाचे (SECI) अदानी कंपनीला कंत्राट मिळाले आहे. हे सहा अब्ज डॉलरचे कंत्राट आहे. एजीएएल कंपनी ही 8 गिगावॅटचे सौर प्रकल्प बांधणार आहे. तर अतिरिक्त दोन गिगावॅटचे सौर सेल बसविणार आहे. यामधून 4 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याची अपेक्षा करण्यात येत आहे.