जळगाव - जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या जळगाव शहरात पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये तोकड्या यंत्रणेतही संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १९८ रूग्णांपैकी १४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ५८ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये मृत्यूदर शून्य असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जळगावमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १६०० रुग्णांवर उपचार करता येतील यादृष्टीने पालिकेने तयारी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. यात एका इमारतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह तर दुसऱ्या इमारतीत हाय रिस्कमधील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जळगावात आजपर्यंत (15 जून) २९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १४० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून शहरातील ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत १९८ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १४० रुग्णांवर वैद्यकीय यंत्रणेने उपचार केल्यानंतर घरी त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची घेतली जाणारी काळजी, दक्षता यामुळे येथील मृत्यूदर शून्य असल्याने ही बाब मनपा प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. भविष्यातदेखील हा मृत्यूदर शून्यच राहील, असा विश्वास महापौर सोनवणे यांनी व्यक्त केला.
शहरात ८० प्रतिबंधित क्षेत्र आहेत. एखादा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर १४ दिवसांनी तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र मुक्त होऊ शकतो. परंतू त्या कालावधीत त्या परिसरात एकही रुग्ण आढळून यायला नको, असे शासनाचे निर्देश आहेत. महापालिका प्रशासनाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अमळनेर, भुसावळ, जळगाव ग्रामीण याठिकाणच्या रुग्णांवरही उपचार करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांना चहापाणी, नाष्टा, जेवणाची सेवा दिली जात आहे. महापौर स्वतः रुग्णांशी बोलून माहिती घेत आहेत.
दोन डॉक्टरांना स्वॅब घेण्याचे प्रशिक्षण -
पालिकेच्या २ वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वॅब घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इतर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षित केले. आजवर जळगाव शहरातील १६०० व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी १३०० व्यक्ती या हाय रिस्क गटातील होत्या. त्यात १५५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. केअर सेंटरमधील स्वॅब घेतलेल्या केवळ ६८ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
अशी आहे पालिकेची टीम -
४७८ पालिकेचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत, ६ कायम डॉक्टर, ५ आरसीएच अंतर्गत डॉक्टर, ५१ परिचारिका, ९ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, १३७ शिक्षक, १२० आशा सेविका, १५० अंगणवाडी सेविका.