यवतमाळ- यवतमाळमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 7 दिवसाचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना आज पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत घरचा रस्ता दाखविला. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी शहरातील चौका चौकात विनाकारण फिरणाऱ्या लोकांना चोप दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासन आणि पोलीस विभागाकडून शहरामध्ये पेट्रोलिंग करत, कुणीही घराबाहेर अनावश्यक फिरू नये, असे आवाहन केले जात आहे. मात्र शहरातील काही नागरिक या सूचनांचे पालन न करता बिनधास्त शहरांमध्ये फिरत आहेत. त्यामुळे, अशा नागरिकांना समज देण्यासाठी आज शहर पोलीस ठाणे, अवधूत वाडी पोलीस ठाणे, लोहारा पोलीस ठाणे आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने बस स्थानक चौक, दर्डानगर, आर्णी रोड, दारव्हा रोड, मार्केट लाईन, दत्त चौक, दाते कॉलेज चौक, अशा विविध ठिकाणी पेट्रोलिंग करत नागरिकांना चांगला चोप दिला. तसेच, शहरातील टवाळखोरांवर कारवाई केली.