नवी दिल्ली - प्रसिद्ध कुस्तीपटू सुशिलकुमार आता राजकारणाच्या आखाड्यात उतरत आहे. दोन वेळा ऑलम्पिक पदक जिंकलेला हा खेळाडू आता निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करणार आहे. राजकारणात नुकताच प्रवेश घेतलेल्या सुशिलकुमारला काँग्रेसच्या तिकिटावर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात आहे.
पश्चिम दिल्लीतून सुशिलकुमारच्या समोर भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांचे आव्हान आहे. भाजप वर्मा यांनाच तिकीट देणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढणारा सुशिलकुमार प्रवेश वर्मा यांचे आव्हान पेलू शकेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दिल्लीतून काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत आहे. अशात पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. सुशिलकुमारला तिकीट देऊन काँग्रेस तरुणांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते.
सुशिलकुमारने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रजत पदक पटकावले आहे. २००९ मध्ये सुशीलकुमारला राजीव गांधी खेल रत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.