मुंबई - वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कसोटी संघातील खेळाडू तयारीला लागले आहेत. कसोटी संघाचे प्रमुख ७ खेळाडू काउंटी क्रिकेट खेळून या स्पर्धेची तयारी करणार आहेत.
भारतीय क्रिकेट बोर्डाने ७ खेळाडूंना काउंटी क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, मयंक अगरवाल, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा या खेळाडूंचा समावेश आहे.
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, पुजाराचा यॉर्कशायर संघाशी ३ वर्षांचा करार आहे. तो पुढेही चालूच राहणार आहे. तर अजिंक्य रहाणे हॅम्पशायर संघाशी करार करू शकतो. त्याला प्रशासन समितीने मंजुरी देणे बाकी आहे.
विश्वकरंडकानंतर भारतीय संघाचा वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पहिला सामना विंडीजशी होणार आहे. मागील वर्षी विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी सरे क्लबकडून क्रिकेट खेळणार होता. पण दुखापतीमुळे त्याला काउंटी क्रिकेट खेळता आले नाही.