मुंबई- महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचालित नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या कामाला अधिक गती येण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सामंत म्हणाले, सीमा भागात महाविद्यालये लवकर स्थापन करणे, तिथे शैक्षणिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी उपलब्ध जागेची पाहणी करून घेणे, अभ्यासक्रम तयार करणे, याबाबतचा तातडीने आराखडा तयार करावा. सिमा भागातील मराठी भाषिक बांधवांशी चर्चा करून शिक्षणासाठीच्या त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यांच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक आराखडा तयार करणे आवश्यक आहे, असे सामंत म्हणाले.
सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, दीपक पवार आदी उपस्थित होते.