नाशिक - 'पुढील सात जन्म हे झाड असंच राहू दे, याला कुणीही तोडू नये, आम्ही पुढच्या जन्मात देखील असंच झाड लावत राहू' अशी शपथ घेत नाशिकमध्ये महिलांनी वट पौर्णिमेचा सण साजरा केला. नाशिकच्या जेलरोड भागातील शिल्पदर्शन सोसायटीमधील महिलांनी वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करत विधीवत पूजा करून वटपौर्णिमेचा सण साजरा केला.
यंदाच्या वर्षी वट पौर्णिमेच्या सणावर कोरोनाचे सावट दिसून आले. काही महिलांनी गर्दीत जाणे टाळत सोसायटीच्या प्रांगणातच पारंपरिक वेशभूषा परिधान करून वडाच्या झाडाची पूजा केली. यावेळी मास्क लावून आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन देखील करण्यात आले, तर काही महिलांनी घरातच वडाच्या झाडाची पूजा करत वट पौर्णिमेचा सण साजरा केला. त्यामुळे यंदा सार्वजनिक ठिकाणी आलेल्या मंदिर परिसरातील वडाच्या झाडाजवळ महिलांची कमी उपस्थिती दिसून आली.
10 झाडे लावून त्यांना जगवण्याचा संकल्प -
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती संगीता गायकवाड यांनी जेलरोड येथील शिल्पदर्शन सोसायटीच्या प्रांगणात महिलांच्या मदतीने 10 झाडांचे वृक्षारोपण केले. तसेच ही झाडे जगवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी अनुसया वाघ, शोभा वाघ, जान्हवी सोनार, राधिका आंबोडेकर, राणी सोनार, कल्पना कापकर, निर्मला शहाणे, रोहिणी कानडे आदी महिला उपस्थित होत्या.