वर्धा - महाराष्ट्रात 1 कोटी 53 लक्ष 37 हजार 832 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात जास्त लसीकरण करण्यात पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भाचा क्रमांक आहे. राज्यात 45 पेक्षा अधिक वयाच्या लाभार्थ्यांचे लसीकरणात लहान जिल्ह्यामध्ये वर्धा आणि भंडारा या दोन जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. यात वर्धा जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर असून जिल्ह्यात 45 पेक्षा जास्त वयोगटातील 36.76 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
राज्यात पहिल्या क्रमांकावर कोल्हापूर असून दुसऱ्या स्थानी सांगली, त्यानंतर सातारा, पुणे, नागपूर, भंडारा, मुंबई आणि वर्धा हा आठव्या स्थानावर आहे. 45 वर्षे वयापेक्षा जास्त वयोगटात 4 लाख 7 हजार 707 नागरिक आहेत, त्यापैकी 1 लाख 69 हजार 466 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वर्धा जिल्ह्यात लसीकरणाला गती देण्यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांनी लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर केला होता.
त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला चांगली गती आहे. सर्व सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी परिश्रम केलेत. ज्येष्ठ नागरिक 45 वर्षावरील अती जोखमीच्या व्याधीग्रस्त रुग्णांचे लसीकरण होईल यासाठी प्रयत्न केले. गावातील ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहित करून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापर्यंत नेण्याचे काम सरपंच आणि ग्रामसेवकांनी पार पाडले. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला असून एकाच दिवशी ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे कामही काही ग्रामपंचायातीने केले आहे. 8 लसीकरण केंद्रापासून सुरू होत संख्या हळूहळू वाढवत 99 केंद्रापर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात आज 2 लक्ष 9 हजार 914 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 1 लक्ष 77 हजार 33 नागरिकांना पहिला डोज, तर 32 हजार 881 दुसरा डोज घेतला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 9 हजार लस उपलब्ध असून शासनाकडून लसीचा पुरवठा नियमित होत आहे.
जिल्ह्यात लसीकरण झालेले लाभार्थी -
हेल्थ वर्कर 27,375
फ्रंट लाईन वर्कर 13,073
60 वर्षावरील 96,635
45 वर्षावरील 72,831
वर्ध्यात लवकरच 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू होणार असून त्यासाठी नियोजन करण्यात आले होते. यात आरोग्य सेवक कर्मचारी यांनी या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे.