बंगळुरू - रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी अंतिम सामन्यापूर्वी चाहत्यांची माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी चाहत्यांनी दिलेल्या सपोर्टमुळे आभारही मानले. या मौसमातील आयपीएलमध्ये बंगळुरूचा संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकला नाही, त्यामुळे त्यानी हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी ही माफी मागितली आहे.
विराट आणि डिव्हिलियर्सने आरसीबीच्या ट्विटर अकांऊटवर एक व्हिडिओ शेयर करत चाहत्यांची माफी मागितली आहे. या व्हिडिओत विराटने म्हटले आहे, की आम्ही प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकलो नाही, याचे आम्हांला दुःख वाटते. फॅन्सकडून मिळालेल्या सपोर्टमुळे त्यांचे आभार.
एबी डिव्हिलियर्स बोलताना म्हणाला, राजस्थानविरुद्धचा ५ षटकांचा सामना माझ्यासाठी विस्मरणीय राहील. हा सामना आम्ही जिंकू शकलो नाही.
आयपीएलच्या १२ व्या सीझनमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीच्या संघाला दमदार कामगिरी करता आली नाही. बंगळुरूने १३ पैकी ४ सामने जिंकले आहेत. बंगळुरूने सुरुवातीचे सलग ६ सामने गमावले होते. मात्र, नंतरच्या ७ सामन्यांतही त्यांना काही खास कामगिरी करता आली नाही.