वॉशिंग्टन डी. सी- येत्या काळात जपानला अत्याधुनिक लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याच्या दिशेने अमेरिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एफ-35 बी लढाऊ विमाने जपानला पुरविण्याबाबत अमेरिकेच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने (DSCA) संसदेत निवेदन जारी केली आहे.
एफ-35 बी विमाने मिळाल्यानंतर जपानची जमिनीवर तसेच सागरी संरक्षण सज्जता आणखी मजबूत होणार आहे. 42 एफ -35 बी विमाने लढाऊ जहाजावर तैनात करण्यासाठी जपानला देण्यात येतील, असे डीएससीएने जाहीर केले आहे. अमेरिका-चीन वाद वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर जपानची शस्त्रसज्जता वाढविण्याचे अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने लढाऊ विमाने विक्री करण्याच्या योजनेला आधीच मंजूरी दिली आहे.
एफ-35 बी या लढाऊ विमानांशिवाय जपानने अमेरिकेकडे 63 एफ-35ए या जेट विमाने, 110 प्रॅट आणि व्हिटनी एफ135 इंजिनांची मागणी केली आहे. जपानला युद्ध सामुग्रीच्या विक्रीने प्रादेशिक समतोल ढासळणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
चीन- जपान वाद आणि अमेरिकेची मदत
चीनने मागील काही वर्षांपासून दक्षिण चिनी समुद्रात आक्रमक धोरण अवलंबले आहे. संपूर्ण दक्षिण चिनी समुद्र चीनच्या मालकीचा असल्याचा अतार्किक दावा चीनने केला आहे. त्यामुळे शेजारील देशांशी चीनचे संबध बिघडले आहे. पॅसिफिक महासागरातील स्येनकाकू या लहान बेटांच्या समुहावरून चीन आणि जपानमध्ये वाद सुरु आहे. दोन्ही देशांकडून या बेटांवर दावा केला जात आहे.
चीनकडून या बेटांवर सतत लष्करी जहाजे आणि विमाने पाठविण्यात येतात. तसेच मातीचा भराव टाकून आणखी प्रदेश हडपण्याच चीन प्रयत्न करत आहे. या सागरी भागात चीनने अनेक वेळा सर्व्हे करण्यासाठी पाणबुड्या पाठविल्या आहेत. चीनच्या या धोरणाला जपानला कडाडून विरोध आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर जपानची संरक्षण सज्जता वाढविण्यासाठी अमेरिकेने लढाऊ विमाने जपानला देण्याचा निर्णय घेतला आहे.