चंद्रपूर- तुमच्या वारंवार तक्रारीमुळे पोलिसांनी आमच्या अवैध दारूविक्री व्यवसायावर गदा आणली आहे. आम्हाला जगू द्या, नाही तर आम्ही तुम्हाला जगू देणार नाही, असे धमकीवजा पत्र चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना पाठविण्यात आले आहे. या पत्राने सर्वत्र खळबळ माजली आहे.
मागील 5 वर्षांपासून जिल्ह्यात दारूबंदी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 'दारू'चा विषय पुन्हा ऐरणीवर आला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारू सुरू करणार असे सांगत आहे. त्यामुळे परवाना धारक दारूविक्रेते दारू सुरू होण्याची वाट बघत आहे. मात्र अवैधरीत्या दारू विकणाऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात अवैधरीत्या दारू विक्री हा मोठा रोजगार झाला आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलाही दारूविक्रीत उतरल्या आहेत. यातून अनेकांनी बक्कळ माया कमविली. काहींचे संसार सावरले. मात्र जिल्ह्यात संघटित दारू तस्करीची चर्चा सुरू झाली. याला राजकीय आशीर्वाद असल्याचे समोर आले. पोलिसांनाही मॅनेज केले गेले. त्यानंतर आपल्या मतदार संघात संघटित दारू विक्री नको, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अनेकदा भेटी घेतल्या व दारूविक्री आळा घाला, अशी मागणी केली.
यावर पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली. यात अपवाद वगळता मोठे मासे हाती लागले. किरकोळ दारूविक्रेत्यांनाच या कारवाईची छळ पोचली. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहे. एका दारू विक्रेत्याने निनावी पत्राद्वारे आपली कैफियत आमदार जोरगेवार यांच्याकडे मांडली. सोबतच जिवे मारण्याची धमकीही दिली.
पत्राच्या सुरवातीलाच तुम्ही आमदार म्हणून चांगले काम करीत असल्याचा उल्लेख आहे. मात्र आमच्या सारख्या बेरोजगार लोकांच्या पोटावर पाय मारणे बरोबर नाही. आपण अवैध दारूसंदर्भात जी भूमिका घेतली, ती चुकीची आहे. ते आपल्या जिवावरही बेतू शकते, अशी चेतवानी सुद्धा पत्रातून देण्यात आली.
पुढे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीचाही उल्लेख केला. आपण वारंवार एसपी साहेबांना भेटता. त्यामुळे दारूविक्रेते त्रस्त झाले आहेत. यात आम्हा गरिबांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमच्या सारख्या बेरोजगारांच्या पोटावर लाथ मारू नका. अन्यथा आपण किंवा आल्या परिवारातील सदस्याची जीवित हानी झाल्यास तुम्ही जबाबदार असाल, अशी धमकीच पत्रातून दिली. चिठ्ठी पोस्टाद्वारे जोरगेवारांच्या कार्यालयात पोहोचली होती. निनावी पत्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना जोरगेवार यांनी सूचना दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.