अकोला - स्थानिक गुन्हे शाखेने 2 जणांकडून चोरीच्या 22 दुचाकी जप्त केल्या आहेत. हे दोन्ही चोरटे बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील रहिवासी असून आंतरराज्यीय टोळी असल्याची माहिती आहे. लक्ष्मण बळीराम दळवी व मंगेश कसनदास राठोड असे चोरट्यांची नावे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून आणखी दुचाकी जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील लक्ष्मण दळवी व मंगेश राठोड या दोघांचा दुचाकी चोरीचा व्यवसाय आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनीही दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांनी पोलिसांना चोरी केलेल्या 22 दुचाक्या दिल्यात. या दुचाकी अकोला, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, कारंजा, सेलू बाजार येथून चोरी केल्याची कबूली त्यांनी दिली. त्यामुळे या दोघांकडे आणखी दुचाकी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, अशोक चाटी, नितिन ठाकरे, राजपाल ठाकरे, शेरव रफिक, अब्दुल माजीद, एजाज अहमद, रवी इरचे, नफीस, अनिल राठोड, निखाडे यांनी केली.