नवी दिल्ली - देशभरामध्ये गेल्या 24 तासात 28 हजार 498 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 553 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 9 लाख 6 हजार 752 झाली आहे. यातील 3 लाख 11 हजार 565 कोरोना रुग्ण हे सक्रिय आहेत तर आतापर्यंत 5 लाख 71 हजार 460 रुग्ण बरे झाले आहेत. गंभिर बाब म्हणजे आतापर्यंत 23 हजार 727 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशामध्ये आतापर्यंत 1 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यातील सोमवारी 2 लाख 68 हजारांपेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. भारत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये जगात तिसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती -
कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस राज्यात वाढत असून राज्यात सोमवार ४ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, सोमवारी कोरोनाच्या ६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.