हिंगोली - दिवसेंदिवस प्रशासनाला प्राप्त होत असलेल्या अहवालामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. मात्र, मंगळवारी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तसेच, तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यामुळे हिंगोलीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्या रुग्णांना प्रशासनाच्या वतीने डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आता जिल्ह्यातील विविध कोरोना वार्ड तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये केवळ तीस रुग्णावर उपचार सुरू आहेत.
बरे झालेल्यांमध्ये वसमत तालुक्यातील बाराशिव येथील दोन आणि औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील एक अशा तिघांचा समावेश आहे. हे सर्व जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती होते. ऐन पेरणीच्या तोंडावर कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्यामुळे ग्रामीण भागात, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे आटोपली असून त्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे शेतीच्या कामावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता होता. मात्र, रुग्ण बरे होत चालल्याने आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकरीराजा सावरायला लागलाय.
आज घडीला विविध कोरोना वार्ड मध्ये 30 रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 201 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. मात्र तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आलेत. यामुळे रुग्णही बरे होत आहेत. सध्या 189 जणांचे अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली आहे.