वर्धा- निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील बऱ्याचशा भागात अंधार झाला. सर्वत्र विद्युत खांब तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. मनुष्यबळाचा अभाव असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोकणाला जाऊन परत आलेले वीज वितरण विभागाचे 3 कर्मचारी आज कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 9 झाली आहे. तिघांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
अंधारातील गावांना प्रकाशमय करण्यासाठी कोकणातील मनुष्यबळ कमी पडत होते. त्यासाठी विदर्भातून साधारण 350 च्या वर कर्मचारी कोकणात गेले होते. जवळपास 15 दिवस कामे करून अनेक गावातील अंधार नाहीसा केला. यानंतर 1 जुलैला रात्री कर्मचारी परत आले. त्यापैकी वर्धा विभागाच्या 7 लोकांना 2 जुलैला सामान्य रुग्णालयात दाखल करून स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 3 व्यक्तींचे वय 52 वर्ष, 37 वर्ष आणि 43 वर्ष (तिन्ही पुरुष) असावे. तिघांचे अहवाल आज कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिन्ही कर्मचारी, आंजी, पिपरी मेघे आणि वर्ध्याच्या समता नगरमधील रहवासी आहेत. विलगीकरणात असताना अहवाल आल्यानंतर तिघांही रुग्णांना सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील इतरांचेही स्त्राव नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी दिली आहे. कोकणातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील 20 कर्मचारी पेण येथे गेले होते. 20 पैकी 6 कर्मचारी हिंगणघाट विभागाचे, 5 आर्वी विभागाचे आणि 9 वर्धा विभागाचे आहेत.
कोरोनाबधितांची संख्या वाढतीवर
मागील आठवड्यापासून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या आता 22 झाली आहे. यात एकाचा मृत्यू आणि 12 जण कोरोनामुक्त झाले आहे.