हैदराबाद - आयपीएलमधील सर्वात दोन मजबूत संघ मुंबई आणि चेन्नई यांच्यात चषकासाठी आज लढत होणार आहे. हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे. मुंबई संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. कारण स्पर्धेत तीनवेळा मुंबईने चेन्नईला पाणी पाजले आहे. दोन्ही संघानी आतापर्यंत तीनवेळा जेतेपद मिळविले आहे.
चेन्नईने यंदा आठव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यत मजल मारली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने आतापर्यंत चारवेळा अंतिम सामन्यात मजल मारली होती. त्यापैकी त्यांना ३ वेळा किताब जिंकण्यात यश आले.
मुंबईचा संघ चार दिवसांच्या विश्रांतीनंतर अंतिम सामना खेळत आहे. चौथ्यांदा आयपीएलचा किताब जिंकण्याचा इराद्याने मुंबईचा संघ उतरेल. रोहितच्या संघापुढे चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांचे आव्हान असेल. इम्रान ताहिर, हरभजन सिंग आणि रवींद्र जाडेजा या फिरकी गोलंदाजसमोर आयपीएलमधील इतर संघ संघर्ष करताना दिसून येतील. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर यानेही यंदाच्या आयपीएलमध्ये छाप सोडली आहे. त्याने आतापर्यंत १९ गडी बाद केले आहेत.
चेन्नईकडे महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना फाफ डुप्लेसी हे तिघेही तुफान फॉर्मात आहेत. त्याचसोबत चेन्नईच्या संघात इतर खेळाडूंही मॅचविनर खेळाडू आहेत. जे कोणत्याही क्षणी सामन्याचा नूर पलटू शकतात.
राजवी गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघासाठी नाणेफेक महत्वाची असेल. आयपीएलच्या आतापर्यंतच्या ११ सामन्यात ७ वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने चषक जिंकला आहे. पण हैदराबादच्या मैदानावर नाणेफेक हारणाऱ्या संघाला फायदा झाला आहे. या सीजनमध्ये ७ पैकी केवळ एकदाच नाणेफेक जिंकलेल्या संघाला यश मिळाले आहे.