धुळे : धुळे तालुका पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका कॉम्प्लेक्समधील मोबाईल शोरूम फोडून लाखो रुपयांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेत १० लाख रुपयांहून अधिकचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेतील ३ आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी ५ लाख ३४ हजार ५७४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुमन शहा सुलेमान शहा (वय 35 राहणार काली खोली गोल्डन नगर मालेगाव), सय्यद हुसेन सय्यद हबीब (वय 21 राहणार शब्बिर नगर मालेगाव) व अन्य एक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, दोघांचा शोध सुरू आहे.
धुळे शहरातील बारापथर चौकात बाफना कॉम्प्लेक्स येथे मालक सनी कुमार तिलोपचंद जैन यांच्या मालकीचे न्यू विमल मोबाईल हे दुकान आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या मोबाईलचे शोरूम आहे. तसेच या ठिकाणी ओप्पो, सॅमसंग, विवो, एमआय, रियल मी, आयफोन अशा विविध नामांकित कंपन्यांच्या मोबाइलची विक्री केली जाते. हे दुकान तालुका पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून चोरट्यांनी दुकानात हात साफ केल्याची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अवघ्या १८ मिनिटात ५ चोरट्यांनी हे मोबाईल चोरून नेले होते.
या ठिकाणी टॅमीचा वापर करत चोरट्यांनी कुलूप तोडले होते. त्यानंतर दुकानात शिरून विविध कंपन्यांचे जवळपास ६० ते ७० मोबाईल चोरून नेले होते. हा प्रकार सोमवारी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी घडला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं असून अवघ्या २४ तासात पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केलं आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणी मालेगाव येथून ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांचे एकूण ४१ हँडसेट असा ५ लाख ३४ हजार ५७४ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात वापरण्यात आलेली लोखंडी कटावणी व मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. यातील तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मालेगाव परभणी येथे वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे देखील दाखल आहेत. गुन्ह्यातील २ आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत हनुमंत उगले रफिक पठाण श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाणे गौतम सपकाळे राहुल सानप आणि धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.