लातूर - दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची भर पडत आहे. मात्र, शनिवारी सर्वाधिक रुग्ण वाढले. या एका दिवसात तब्बल 13 नवे रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
शनिवारी जिल्ह्यातील 112 व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी 91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून 8 अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये लातूर शहरातील भुसार लाईन, शाहवली मोहल्ला येथील प्रत्येकी एक तर खडगाव येथील बाधितांच्या संपर्कात आलेले चौधरी नगरातील 3 रुग्णांचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागातील बाभळगाव येथे कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या दोघांना लागण झाली आहे. याशिवाय, पाखरसंगावी येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. उदगीर येथील विकास नगरातील 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, हनुमान नगर येथील एकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शनिवारच्या एका दिवसात 13 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण कुणाच्या संपर्कात आलेला आहे, याचा शोध घेणे कसरतीचे काम आहे. कारण, लॉकडाऊनमध्ये शिथिलता निर्माण झाल्यानंतर सर्व बाजारपेठही खुली झाली आहे. शिवाय, बाभळगावातील रुग्णाला कुणापासून बाधा झाली, हे अद्यापही स्पष्ट नाहीये. ही व्यक्ती लातुरातील भुसार लाईनमधील किराणा दुकानात कामाला होती. त्यामुळे वाढत्या रुग्णांची संख्या आणि बाजारपेठेतील गर्दी हा चिंतेचा विषय बनला आहे.