सिंधुदुर्ग- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 2 ते 8 जुलै या कालावधीत 7 दिवसासाठी लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद असणार असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा आणि शेतीची कामे सुरू राहणार आहेत. तसेच, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सुरू झालेल्या बाजारपेठा बंद राहणार आहेत. फक्त वैद्यकीय सुविधा सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींना अलगीकरणामध्ये ठेवण्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे उपस्थित होते.