हैदराबद (तेलंगाणा)- येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी तेलंगाणा येथील भाजप नेते व मुख्य प्रवक्ते कृष्ण सागर राव यांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना आमंत्रण दिले आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होईल आणि त्यात पंतप्रधान मोदी हे उपस्थिती राहतील. त्यांच्या हस्ते मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल. या पुढे भगवान राम यांचा जन्म मोठ्या उत्साहाने राम मंदिरात साजरा केला जाईल. तसेच, राम मंदिर निर्मितीचे जे स्वप्न कोटी कोटी लोकांनी बघितले होते, ते भाजपच्या शासन काळात प्रत्यक्षात उतरले, याबद्दल भाजपला अभिमान असल्याचे, राव म्हणले.
ते पुढे म्हणाले की, राम मंदिर भूमीपूजन संबंधी डावे पक्ष आणि एमआयएमने जे आक्षेप नोंदवले आहेत ते निराधार आहेत. मला नाही वाटत कोणी या आक्षेपांना उत्तर देण्याची गरज आहे, कारण संविधानाने प्रत्येकाला त्याचा धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य दिले आहे आणि पंतप्रधान मोदी देखील त्याला अपवाद नाही. मी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, जे भूमिपूजनाला विरोध करत आहेत, तसेच ओवैसी याना या सोहोळ्यासाठी आमंत्रित करतो. सोहोळ्याला उपास्थिती राहून या नेत्यांनी त्यांच्या पक्षातील धर्मनिरपेक्षतेची भावना व्यक्त करावी, तसेच बंधुत्वतेप्रति वयक्तिक सहिष्णुता दाखवावी, असे आवाहन राव यांनी केले.