चेन्नई (तामिळनाडू)- तामिळनाडू राज्य सरकारने जयललिता यांचे चेन्नईतील पॉईस गार्डन येथील निवासस्थान खरेदी केले आहे. हे निवासस्थान विकत घेण्यासाठी राज्य सरकारला 67.9 कोटी रुपये किंमत मोजावी लागली.
राज्य सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यानुसार, 12 हजार 60 रुपये प्रति चौरस फूटप्रमाणे 24 हजार 322 चौरस फूट जागा विकत घेतली. त्यामुळे जागेची किंमत 23 कोटी आणि त्यात 36.9 कोटीची आयकर थकबाकी, हे सर्व पकडून राज्य सरकारने जयललिता यांच्या निवासस्थानासाठी 67.9 कोटी दिले आहेत.
दरम्यान, या महिन्याचा सुरुवातीला राज्य सरकारने, अपस्केल पॉईस गार्डन येथील जयललिता यांचे वेदा निलायम, हे निवासस्थान मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान करणार असल्याचा विचार असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाला कळविले होते. त्यानंतर राज्य शासनाने वेदा निलायम हे निवासस्थान व तेथील जंगम मालमत्तेला तात्पुरते ताब्यात घेण्यासाठी एक अध्यादेश देखील काढला होता. निवासस्थानाला एका स्मारकात रुपांतरित करण्याच्या उद्देशाने सरकारने हे केले होते. यावर उच्च न्यायालयाने जे. दीपक याला जयललिता यांचा भाचा तर जे. दीपा हिला भाची असल्याचे घोषित केले होते व राज्य सरकारला निवासस्थानाच्या काही भागाचे स्मारकात रुपांतर करावे, असे सूचवले होते. तसेच, निवस्थानाच्या काही भागाचा वापर मुख्यमंत्र्यांच्या निवस्थानासाठी करण्यात येईल, असेही उच्च न्यायालयाने सूचवले होते.