सोलापूर - मुंबईप्रमाणे सोलापुरातही कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा लपविण्यात आल्याचा प्रकार काल (सोमवार) उघडकीस आला होता. या मुद्यावरून आज भाजप नेतृत्वाने आवाज उठविला आहे. 40 कोरोनाबाधित मृतांची माहिती लपवणे ही धक्कादायक आणि गंभीर बाब आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाची चौकशी व्हावी आणि यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून आज करण्यात आली आहे.
आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आणि भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. उद्या महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच मुद्यावरून सोलापूरला येणार आहेत. प्रशासनाकडून लपवलेली मृत्यू संख्या बाहेर आली आहे. या 40 मृत रुग्णांची माहिती कोणी आणि का लपवली, यात कोणाची चूक आहे? दोषी कोण आहेत? आणखी किती जणांच्या मृत्यूची नोंद केली नाही? याची उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.
जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना शिष्टमंडळाने केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.