कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच राज्यभरातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक मात्र होत आहे.
कोरोनाचा धोका ओळखून निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी गोकुळच्या सत्ताधारी गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश आज दिले. त्यामुळे गोकुळची निवडणूक होणारच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मतदान केंद्राची संख्या वाढविण्याचे आदेश -
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी येत्या 2 मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण 35 केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या आदेशात मतदान केंद्र वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता मतदान केंद्र वाढणार असून मतदान प्रक्रियासुद्धा सुरुच राहणार आहे.