मुंबई - राज्यात मागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या रिक्त राहत असलेल्या जागा आणि यंदा कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता सरकारने अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीत केवळ एक गुण आणि बारावीत ४५ गुण मिळाले तरी अभियांत्रिकीला प्रवेश मिळणार आहेत. याबद्दल सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा एक राजपत्र प्रसिद्ध केले आहेत.
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अ तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यामध्ये अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. राज्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी यापूर्वी बारावीच्या गुणांची अट ही ५० टक्के इतकी होती. ती आता सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी ४५ आणि मागासवर्गासाठी ४० टक्के इतकी केल्यामुळे बारावीत सर्वात कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही अभियांत्रिकी प्रवेशाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सरकारच्या या नवीन निर्णयामुळे प्रवेशासाठीच्या देण्यात आलेल्या नव्या निकषांनुसार पाच टक्क्यांची अधिक सवलत देण्यात आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह इतरा राज्यांप्रमाणे महारष्ट्रातही बारावीच्या गुणांची ही अट शिथील करावी अशी मागणी विविध शिक्षण संघटनांकडून केली जात होती. परंतु तंत्र शिक्षण संचालनालयाकडून मात्र गुणवत्तेचा विचार करत ही मागणी मान्य केली जात नव्हती.
दरम्यान, आता सरकारकडून काढण्यात आलेल्या राजपत्रात अभियांत्रिकीच्या प्रवेशासोबत सोबतच औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी (पाच वर्षे) अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही ५० व ४५ टक्क्यांवरून ४५ व ४० टक्के अशी करण्यात आली आहे. यामुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थीसुद्धा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला सहजपणे प्रवेश घेऊ शकतात.
दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने दरवर्षी राज्यात अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहतात. तर प्रत्येक वर्षी अनेक अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांना टाळे लागण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर बारावीच्या गुणांची अट शिथील करण्यात आल्याने गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता अभियांत्रिकीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.