नवी दिल्ली : स्पाईस जेट विमानसेवा कंपनीने त्यांच्या प्रवाशांकरता आता एक नवीन चेक-इन सुविधा सुरू केली आहे. या कंपनीने आज(गुरुवार) 'मिस पेपर' नावाच्या व्हॉट्सअॅपवर '6000000006' क्रमांकासह आपली सेवा सुरू केली आहे. यामुळे स्पाईस जेटचे ग्राहक आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही वेब चेक-इनसह इतर अनेक सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, मे महिन्यात सरकारने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होण्याकरता नागरिकांना प्रवास करण्याआधीच्या 48 तासांपासून तर 60 मिनिटांआधी चेक-इन करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता स्पाईस जेटच्या "मिस पेपर" नावाच्या स्वयंचलित ग्राहक सेवा 6000000006 या मोबाइल नंबरवर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर प्रवाशाला विमानतळावरील चेक-इन प्रोसेससाठी मदत मदत मिळणार आहे. याकरता प्रवाशांना कंपनीच्या बेवसाईटला व्हिजिट करण्याची गरज पडणार नसून बोर्डिंग पासदेखील सरळ प्रवाशांच्या मोबाईलवरच पाठविला जाणार आहे. वेबसाइट आणि कंपनीच्या मोबाइल अॅपवरही ही सुविधा उपलब्ध असल्याचे स्पाईस जेट एअरलाइन्सने सांगितले आहे.
प्रवाशांना विमानतळावर पोहोचायच्या आधी सदर व्हाट्सअॅप नंबरवरुन मिस पेपरला 'हाय' असा संदेश पाठवायचा आहे. यानंतर, सदर स्वयंचलित एजंट हा ग्राहकाला चेक-इनच्या प्रोसेससह इतर गोष्टींकरता मदत करेल. तसेच, ग्राहकाला त्याचा बोर्डिंग पासदेखील थेट मोबाइल फोनवर मिळेल" यासोबतच, व्हॉट्सअॅपवर ग्राहकांचे प्रश्नही स्वयंचलित एजंट सोडवतील. ही सेवा 24 तास उपलब्ध असणार असून अशी सेवा देणारी स्पाईस जेट ही देशातील पहिली विमानसेवा कंपनी ठरणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर 25 मे रोजी भारतातून स्थानिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, प्रवाशांना प्रवासादरम्यान सामाजिक अंतर आणि इतर नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, प्रवाशांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ऑनलाईन चेक-इन सारख्या विविध नियमांचे प्राथमिकतेने पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.