यवतमाळ - सप्टेंबर महिन्यात आलेल्या मुसळधार पावसात जिल्ह्यात कपाशी, तूर,मूग,उडीद पिकांचे नुकसान झाले होते. त्यातही सोयाबीन पीक काही प्रमाणात वाचले होते. सोयाबीनच्या शेंगाचीही नासाडी झाल्याने वाई येथील कृष्णा वायकर या शेतकऱ्यांनी दोन दिवसापूर्वी सोयाबीनची सोंगणी करून शेतात ढीग रचून ठेवले. मात्र, आलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे दाणे फुटून पूर्ण सोयाबीन पीक वाया गेले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आता आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले होते. सोयाबीन काढणीला आले असताना पावसामुळे झाडाच्या शेंगांना कोंब फुटले होते तर कपाशीची बोंडे सुद्धा काळवंडून गेली होती. तसेच तूर, मूग, उडीद या पिकांनाही फटका बसला होता. यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. अशातच काही प्रमाणात वाचलेल्या सोयाबीनचे पिकामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. आता सोयाबीन पीक काढणीला आले आहे. मात्र, परतीचा पाऊस नुकसान करणारा ठरत आहे. आधीच सोयाबीनला उतारा नाही. त्यात पीक मातीमोल होत आहे. या परतीच्या पावसाने यवतमाळ तालुक्यातील वाई रुई येथील शेतकरी कृष्णा वायकर यांच्या शेतातील सोयाबीन पीक उध्वस्त झाले आहे.
दरम्यान, कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचेही पंचनामे केले नाही. त्यामुळे आतातरी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून निदान दिलासा ध्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.