सोलापूर - युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित बेरोजगार युवकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी सोलापूर शहरात आंदोलन करण्यात आले. रोजगाराच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने "मोदी सरकार रोजगार दो" असे नारे लावत शहरातील बेगम पेठ येथील विविध दुकानामध्ये जाऊन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'भीक मांगो' आंदोलन केले.
दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, असे खोटे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, कोणतेही नियोजन न करता केलेली नोटबंदी, चुकीच्या पद्धतीने लागू केलेली जीएसटी प्रणाली , इंधन दरवाढ, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण या सर्वामुळे देशातील कोट्यवधी छोटे, मोठ्ठे उद्योग बंद पडले आहेत. रोजगार देण्याऐवजी भाजप सरकारने रोजगार हिरावून घेतले. गोरगरीब तरुण बेरोजगारीमुळे पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी वणवण भटकत आहेत.
रविवारी सकाळी अनेक सुशिक्षित युवक एकत्र येऊन ‘मोदी सरकार रोजगार दो’ म्हणत बेगम पेठ येथे ‘भीक मांगो’ आंदोलन केले. जमा झालेले पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकारने चुकीचे निर्णय घेऊन रोजगार हिरावून घेण्यापेक्षा चांगले निर्णय घेऊन रोजगार निर्मिती करावी, अशी मागणी आंदोलक युवकांनी केली.
शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले यांच्या प्रमुख उपस्थितित हे ‘भिख’ मागो आंदोलन पार पडले. यावेळी स्नेहल भोसले, राजासाब शेख, किरण राठोड़, गणेश सुरवसे, शंकर महाडिक, शरद गुमटे, तिरुपती परकीपंडला, गणेश कुंभार, राहुल गोयल, आनंद कोळी, संदीप कटके, महेश लोंढे, मुजाहिद जमादार, सुभाष वाघमारे, सचिन धोत्रे, यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.