औरंगाबाद - सिल्लोडमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर महसूल विभागाने सोमवारी (दि.1 जून) मध्यरात्री छापा टाकत धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. महसूल विभागाले केलेल्या या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभागासोबतच महसूल विभागचे अधिकारी आणि कर्मचारी या कामी व्यस्त आहेत. याचा फायदा घेत तालुक्यातील काही वाळू माफियांनी अवैध वाळू उपशाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील आणि तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने पथक तयार केले. या पथकाच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
सोमवारी मध्यरात्री हे पथक सिल्लोड तालुक्यातील अंधारी शिवारात गस्त घालत असताना श्रावण शिवाजी शिंदे (रा. उपळी) यांचे विना क्रमांक ट्रक्टर वाळू वाहतूक करताना आढळून आले. या वाहनांमध्ये 1 ब्रास वाळू आढळून आली. संबंधिताकडे कोणताही परवाना नसल्याने ट्रॅक्टर वाळूसह जप्त करण्यात आले आहे. हे वाहन जप्त करून तहसील कार्यालय सिल्लोड येथे जमा करण्यात आले असून संबंधीताच्या विरोधात एक ब्रास साठी एक लाख 30 हजार चारशे रुपयांची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केली आहे.
दरम्यान, ही कारवाई पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी संभाजी देशमुख, पोलीस उपनिरीक्षक ढगारे, तलाठी विष्णू पवार , काशिनाथ ताठे , देवतुळे, गंगावणे , बी.पी. पाटील यांच्यासह वदोद बाजार पोलीस स्टेशन चे 2 कर्मचारी यांनी केली.