बीजिंग - चीनमध्ये ढेकणांमुळे पसरणाऱ्या (tick-borne) विषाणूमुळे झालेल्या नवीन संसर्गजन्य आजारामुळे सात जण ठार झाले आहेत. तर, 60 जणांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती अधिकृत माध्यमांनी बुधवारी दिली. तसेच, या विषाणूचा माणसाकडून माणसाकडे आणखी संसर्ग पसरण्याची शक्यता आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.
वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत पूर्व चीनच्या जिआंग्सु प्रांतातील 37 हून अधिक लोकांना थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (एसएफटीएस) विषाणूमुळे तीव्र तापाची लक्षणे जाणवली. नंतर, पूर्व चीनच्या अन्हुई प्रांतात 23 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती सरकारी ग्लोबल टाईम्सने प्रसिद्धी माध्यमांनी दिली आहे.
जिन्ग्सुची राजधानी नानजिंग येथील एका महिलेला विषाणूमुळे ग्रासलेला ताप, खोकला ही लक्षणे दिसू लागली. तिच्या शरीरात ल्युकोसाइट, रक्तातील प्लेटलेटसची घट झाल्याचे डॉक्टरांना आढळले. महिनाभराच्या उपचारानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले.
अन्हुई आणि पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतात या विषाणूमुळे सात जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
एसएफटीएस व्हायरस हा नवीन व्हायरस नाही. चीनमध्ये २०११ मध्ये विषाणूचे रोगजनक वेगळे केले गेले आणि ते बुनियावायरस प्रकारातील आहेत. हा विषाणू ढेकणांच्या माध्यमातून मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो, असे विषाणूशास्त्रज्ञांना वाटते.
झेजियांग विद्यापीठाच्या अंतर्गत प्रथम संलग्न रुग्णालयातील डॉक्टर शेंग जिफांग म्हणाले की, मानवाकडून मानवाकडे संक्रमणाची शक्यता वगळता येणार नाही. एका रुग्णाकडून रक्त किंवा नाकातील चिकट स्रावाद्वारे किंवा लाळेच्या थेंबांद्वारे इतरांकडे विषाणू संक्रमण होऊ शकते. मात्र, ढेकूण चावणे हे याच्या संक्रमणाचा प्रमुख कारक आहे, असा इशारा डॉक्टरांनी दिला. लोक सावध असतील तर अशा विषाणूच्या संसर्गामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.