सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरना रुग्ण संख्या त्रिशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना आता आरोग्य यंत्रणेसह सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाले आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सावंतवाडी पोलिसांकडून संचार बंदीची कडक अंमलबजावणी केल्या गेल्याने शहरात नागरिक सामाजिक अंतराचे नियम पाळताना दिसले.
दोनच दिवसापूर्वी लॉकडाऊन असतानाही सावंतवाडी शहरात गर्दी दिसून आली होती. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आज विशेषतः मच्छी मार्केट व गांधी चौक परिसर तसेच भाजी मार्केट परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संचार बंदीच्या काळात मास्क न लावून फिरणाऱ्या 14 जणांवर दंडात्मक कारवाई पोलिसांकडून करण्यात आली.
चिकन मार्केटमध्ये गर्दी होऊ नये यासाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था तसेच सोशल डिस्टन्स पाळण्याची सूचना पोलिसांकडून देण्यात आल्याने मच्छी मार्केट व चिकन सेंटर परिसरात पोलिसांना गर्दीवर नियंत्रण आणता आले. तसेच पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने सावंतवाडी शहरात नागरीक सोशल डिस्टन्सचे पालन करताना दिसून आले.