सातारा - राज्य सरकारच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व केशकर्तनालय/सलून दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा यांना सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
सलून व ब्युटी पार्लरमध्ये ग्राहकाला मास्क लावता येत नसल्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आले आहेत. सुरक्षा आदेशाचे उल्लंघन केल्यास 500 ते 2 हजारापर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे.
ही घ्यावी लागेल काळजी
- फक्त केशकर्तन करणे, केसांना डाय करणे, वॅक्सिंग, थ्रेडींग इत्यादी साठीच परवानगी.
- त्वचेशी निगडीत सर्व प्रकारच्या सेवांना परवानगी नाही.
- केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये ठेवलेल्या रजिस्टरमध्ये ग्राहकांची नोंद करावी.
- दुकानदाराने संभाव्य वेळेची सूचना देवून ग्राहकांना बोलवावे.
- प्रथम ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक दुकानात घ्यावा.
- दुकानात कारागीर व ग्राहक असे दोघेच असतील, उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील.
- मोठ्या दुकानात 2 खुर्चीमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल.
- केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या व्यक्ती व कारागिरांनी चेहऱ्यावर मास्क लावून त्यावर फेसशिल्ड कायमस्वरुपी घाला.
- ग्लोव्हस व ॲप्रण घालणे बंधनकारक.
- वापरलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण आवश्यक.
- दुकानातील भूपृष्ठभागाला दर 2 तासांनी सॅनिटाईज करणे.