पुणे - येथील पुण्यातील मार्केट यार्डमध्ये देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी हापूस आंब्याची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारपेठेतील 3 आडत्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून 17 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पुण्यातील मार्केटयार्डमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असते. कोकणातील देवगड रत्नागिरी येथून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. याशिवाय कर्नाटकातूनही हापूस आंबा या मार्केटमध्ये येतो. मात्र, या दोन्ही आंब्यांच्या चवीमध्ये फरक असतो. तरीसुद्धा काही विक्रेते कर्नाटक हापूस आंब्याची देवगड हापूस आंबा भरून विक्री करत असल्याचे प्रकार वारंवार घडतात.
दरम्यान, सोमवारी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी आंबा बाजाराला भेट दिली असता काही अडते देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकत असल्याचे उघडकीस आले. कर्नाटकातील हापूस 'देवगड हापूस आंबा' या नावाच्या पेटीत भरून तो विकला जात होता. त्यानंतर गरड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तीन आडत्यावर कारवाई केली.