वॉशिंग्टन - कोरोना विषाणू संबधी रशियाची गुप्तचर यंत्रणा खोटी माहिती पसरवत आहे. अमेरिका कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच रशिया या महामारीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीचा फायदा घेत असून इंग्लिश वेबसाईटचा आधार घेवून खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप अमेरिकेने रशियावर केला आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रध्यक्ष पदाची निवडणुका प्रस्तावित आहेत. त्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न रशिया करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
अमेरिकेतील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी रशियाने अमेरिकेला तत्काळ आणि मोठ्या प्रमाणात मदत केल्याचे काही लेखांमध्ये म्हटले आहे. या खोट्या माहितीवर अमेरिकेतील अधिकाऱ्यांचे लक्ष गेल्यानंतर इतरही माहिती उघड झाली. 2016 साली अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष निवडणुकीत रशियाने सोशल मीडियाद्वारे खोेटी माहिती पसरवणारे अभियान चालविल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. या अभियानाचा फायदा ट्रम्प यांना निवडून येण्यात आणि हिलरी क्लिंटन यांचा पराभव होण्यात झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणी चौकशीही झाली होती. मात्र, 2016 ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झाले आहे.
रशियातील गुप्तचर विभागातील दोन वरिष्ठ अधिकारी यासाठी जबाबदार असून अमेरिकी आणि पाश्चिमात्य लोकंपर्यंत खोटी माहिती पोहचण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मे आणि जुलै महिन्यात अमेरिकेबाबत अपमानकारक आणि खोटी माहिती पसरविणारे 150 लेख एका इंग्रजी वेबसाईटद्वारे पसरविल्याचे अधिकाऱ्यांंनी म्हटले आहे.
रशियाच्या खोटी माहिती पसरविण्याच्या अभियानाचा हेतू नागरिकांना गोंधळात टाकण्याचा असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या विरोधकांबाबत दिशाभूल करणारी माहिती रशिया पसरवत आहे. 2016 सालीही अशाच प्रकारची माहिती पसरविण्यात आली होती. अमेरिकेने फेक माहिती पसवणाऱ्या काही वेबसाईची नावेही दिली आहेत. InfoRos.ru, Infobrics.org, and OneWorld.press या साईटवरून पाश्चिमात्य देशांविरोधात माहिती पसरविण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.