जयपूर - राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात भेदक गोलंदाजी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. वरुणने या बहारदार कामगिरीचे श्रेय काउंटी क्रिकेटला दिले आहे. वरुणने ३ षटकांत १० धावा देत २ महत्वाचे गडी बाद केले. त्याने एका सुंदर इनस्विंग चेंडूवर ख्रिस लिन आणि शुभमन गिल यांच्या दांड्या गुल केल्या.
वरुणला मागील वर्षी आयपीएलमध्ये कुणीच खरेदी केले नव्हते. त्यानंतर त्याने काउंटी क्रिकेटचा रस्ता धरला. इंग्लंडमध्ये लीसेस्टरशर या लीगकडून क्रिकेट खेळला. तिथे त्याने गोलंदाजीत बऱ्याच सुधारणा केल्या.
वरुण त्याच्या या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, मी नेहमीच इनस्विंग गोलंदाजी करत होतो. पण काउंटी क्रिकेट खेळल्याने त्यात अधिक सुधारणा झाली. त्यामुळे मी आता पुन्हा काउंटी क्रिकेट खेळणार आहे. मागील वर्षी तेथे क्रिकेट खेळताना खूपच मजा आली. सध्या मी खूपच तंदुरूस्त आहे. वरुणने यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ दोनच सामने खेळले आहेत.