पुणे - मंगळवारपासून पुण्यामध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु असे असले तरीही काही नागरिक मात्र रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसून येत आहे. अशा नागरिकांसाठी पुणे पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. पुण्यातील बिबवेवाडी आणि कात्रज परिसरात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गांधीगिरी मार्गाने धडा शिकवण्यात आला आहे.
पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देत त्यांना लॉकडाऊन सुरू असल्याची जाणीव करून दिली. लॉकडाऊनच्या काळात याआधी नियम मोडणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी व्यायाम करण्याची शिक्षा दिली होती, तर कुठे काठीने मारहाणही केली होती. तरीदेखील नागरिक नियम पाळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारचा गांधीगिरीचा मार्ग अवलंबला.
दरम्यान, पुण्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. ऑनलाईन पास नसणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी चौका-चौकात बॅरिकेड्स लावून नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर फक्त अत्यावश्क सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात येत आहे.