मुंबई - मुंबईत काेराेनाच्या या संकटकाळात खासगी रुग्णवाहिकांचे मालक रुग्णांची सेवा म्हणून न पाहता कमावण्याची संधी म्हणून या संकटाचा फायदा उठवत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाट्टेल ती किंमत रुग्णवाहिकांचे मालक मागत आहेत. ही गंभीर बाब असून त्याची दखल घेत महापाैर किशाेरी पेडणेकर यांनी साथ राेग नियंत्रण कायद्याअंतर्गत खासगी रुग्णवाहिकांच्या मालकांविरूद्ध कठाेर कारवाई करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत.
नातेवाईकांची लूटमार -
मुंबईत काेराेनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा अनेक रुग्णालयांमध्ये निर्माण हाेत असल्याने रुग्णांना दुसरीकडे हलविण्याचे प्रमाण वाढत आहे. अशी वेळी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करतात. मात्र, याच संधीचा फायदा खासगी रुग्णवाहिकांचे मालक उठवत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची ते अडवणूक करीत आहेत. हा प्रकार गंभीर असून या प्रकाराची महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. लोकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील महापौरांनी दिली. मुंबईतल्या मुंबईत जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिका कंपन्यांकडून दहा हजार रुपयांची आकारणी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.
माणूसकी विकली जातेय -
कोरोना संकटात आतापर्यंत विविध घटनांमधून माणुसकीचे दर्शन घडले होते. पण सध्या लोकांनी आपली माणुसकी कशाप्रकारे विकली असल्याचे दिसून येत आहे. लोकांना पैशांची गरज आहे. पण याचा अर्थ असा नाही की 10-20 किमी अंतरासाठी वाटेल तेवढे पैसे घ्याल? राज्य सरकारने दर निश्चित करुनही अशा तक्रारी प्राप्त होत असतील तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई व्हायला हवी, अशी ठाम भुमिका महापाैर किशाेरी पेडणेकर यांनी मांडली आहे. तसेच कारवाईचे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुंबई महापालिकेने रुग्णवाहिका वाढविल्या आहेत. शिवाय आणखी काही रुग्णवाहिका पालिकेकडून घेण्यात येत आहेत. त्यामुळे आपण पूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण या काळात ज्यांनी माणुसकी विसरुन धंदा सुरू केला आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे, असेही त्या म्हणाल्या.