जळगाव - जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील एका कैद्याने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची रविवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.परंतु, या घटनेमागे कारागृहातील अनागोंदी आणि कैद्यांवर टाकला जाणारा दबाव ही कारणे असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
सुंतीलाल उर्फ शांताराम बाबुलाल पावरा (वय 38) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या न्यायाधीन कैद्याचे नाव आहे. त्याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. 1 एप्रिल 2019 पासून तो जिल्हा कारागृहात आहे. कारागृहाच्या कार्यालयीन नियमावलीनुसार त्याच्याकडे स्वयंपाकगृहाची जबाबदारी देण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांसाठी जेवण बनवण्याचे काम तो करतो. रविवारी सुंतीलालने कारागृहातील नियमावलीनुसार त्याचा मेव्हणा राजू सखाराम पावरा यांच्याशी फोनवर बोलणे केले. मेहुण्याशी तो फोनवर 3 मिनिट 36 सेकंदांपर्यंत बोलत होता. दोघांमध्ये काहीतरी संभाषण झाले. परंतु, ते पावरी भाषेत बोलत असल्याने ते कुणालाही समजले नाही. सकाळी त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला प्राथमिक उपचारासाठी करण्यात आले. यावेळी त्याची विचारपूस केली असता त्याने स्वयंपाक घरातील साफसफाईसाठी आणलेले फिनाईल प्राशन केल्याचे सांगितले. कारागृह रक्षक विक्रम हिवरकर, दत्ता खोत, अमित पाडवी, सीताराम हिवारे यांनी त्याला ताबडतोब डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले.
त्यानंतर सुंतीलालची फोनवरील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासली असता, काही माहीती समोर आली. सुंतीलालने त्याच्या मेहुण्याकडून घरचा फोन नंबर मागितला होता. तेव्हा मेहुण्याने नंबर नसल्याचे सांगितले होते. म्हणून सुंतीलाल पावरा याने मेहुण्यास लवकरात लवकर जामीन करण्याची विनंती केली, मात्र त्याने लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण असल्याचे सांगितले. मात्र सुंतीलालने पत्नीच्या अंगावरील दागिने विकून वकील करुन जामीन करण्याची विनंती केली. त्यांच्या एकंदरीत संभाषणावरून, जामीन होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या घटनेनतर, सोमवारी कारागृह रक्षक विक्रम मोतीराम हिवरकर यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून सुंतीलाल पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कारागृहातील कैद्यांमध्ये असंतोष असल्याच बोलले जात आहे.25 जुलैला कारागृहातून 3 कैदी कारागृह रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून पळून गेले होते. या प्रकरणानंतर कारागृह प्रशासन रडारवर आले आहे. कैदी पळून गेल्यानंतर दोन कारागृह अधीक्षक बदलून गेले. आता पेट्रस गायकवाड हे कारागृह अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीवर कैदी नाराज असल्याची चर्चा आहे. दोन आठवड्यांपूर्वी कारागृहातील काही कैद्यांनी जेवणाबाबत तक्रार केल्याने त्यांना जालना येथील कारागृहात हलविण्यात आले होते. यावेळी कारागृह प्रशासनाने कैद्यांच्या क्षमतेचे कारण पुढे केले होते. आता कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर कारागृहातील कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कैद्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात नेमके काय घडले आहे? हे मात्र अनुत्तरित आहे. मध्यंतरी कारागृहात एका कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या कैद्याच्या नातेवाईकांनीही कलाल पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.